चाकण येथे दरोडोखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

पोलिसांवर हल्ला

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचोशी -केंदूर रस्त्यावरील चिंचोशी घाटात रात्री सव्वा बाराच्या सुमारास विविध गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सचिन भोसले याला पकडण्यासाठी पिंपरी- चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी सापळा लावला होता. त्यावेळेस आरोपी भोसले याने उपायुक्त व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

 

गेल्या आठवड्यात खेड तालुक्यातील बहुळ गावात एका घरात दरोडेखोरांनी चोरी केली होती. त्यावेळी दरोडेखोरांनी पती-पत्नीवर हल्ला केला होता. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले होती. दोन दरोडेखोरांना चाकण पोलिसांनी अटक केली होती. पण, याच टोळीतील आणखी दोघे पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराडसह आठ जणांचे पथक रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी गावाच्या परिसरात असलेल्या मंदिरात दोघेजण दबा धरून बसल्याची माहिती मिळाली. नंतर मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री सव्वा बाराच्या सुमारास स्वत: पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दरोडेखोरांच्या दिशेने निघाले. दरोडेखोरांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले. पण, दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढे आले.

दरोडेखोरांपैकी एकाने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. पोलीस उपायुक्त पवार यांनी बंदूक काढली. पण, दरोडेखोराने पोलीस उपायुक्त पवारांवर कोयत्याने वार केले. पोलीस उपायुक्तांच्या छातीला कोयता चाटून गेला. त्यात पवार रक्तबंबाळ झाले. अशात पवार यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकली. मग सहाय्यक पोलीस निरीक्षक जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढे आले. त्याने जराड यांच्यावरही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर जखम झाली. जखमी अवस्थेत असेल्या पोलीस उपायुक्त पवार यांनी दुसरी गोळी दरोडेखोराच्या पायावर झाडली. दरोडेखोर जमिनीवर कोसळला. त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन दरोडेखोराला पथकातील अन्य पोलिसांनी ताब्यात घेतले. वीस मिनिटे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक घडली. पोलीस उपायुक्त पवार यांच्या छातीवर पाच टाके पडले आहेत. पवार हे थोडक्यात बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जराड हे सुद्धा जखमी झाले आहेत. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, जखमी दरोडेखोरावर उपचार सुरू आहे. दुसरा अल्पवयीन दरोडेखोर ताब्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here