भोजपूर (बिहार) (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील आरा बाजारातील गोपाली चौक येथील तनिष्क शोरूममध्ये गुन्हेगारांनी घुसून शोरूममधील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि अवघ्या २० मिनिटांत २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने लुटले. गुन्हेगारांनी कोणीही आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोरांची संख्या ६ ते ७ असू शकते. पोलिसांनी शोरूममधील सीसीटीव्ही जप्त केले असून यामध्ये, गुन्हेगारांना शोरूममध्ये २० मिनिटे दिसतात आणि त्या काळात ते २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने पळून घेऊन जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांच्या दोन पथकांनी डायरा परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी तनिष्क शोरूम उघडताच दोन दरोडेखोर ग्राहक असल्याचे भासवून आत घुसले. या गुन्हेगारांनी आत प्रवेश करताच त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला ओलीस ठेवले. दरम्यान, आणखी तीन गुन्हेगार आत शिरले. या दरोडेखोरांनी शोरूममध्ये उपस्थित असलेल्या सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवले आणि त्यांना एका ठिकाणी उभे केले. यानंतर, उर्वरित गुन्हेगारांनी शोरूममध्ये असलेले दागिने गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी, मौल्यवान दागिन्यांचा पत्ता न सांगितल्याबद्दल एका सेल्समनवरही हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकाने हल्ला केला.
दरम्यान पोलिस सूत्रांनी दावा केला की नंतर दोन्ही गुन्हेगार छपराकडे पळून गेले. तनिष्क स्टोअरचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय म्हणाले की, सुमारे ५० कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते. ज्यामध्ये आठ सशस्त्र गुन्हेगारांनी २५ कोटींहून अधिक किमतीचे हिरे आणि मौल्यवान सोन्याचे दागिने इत्यादी लुटले.







