अल्पवयीन मुस्कान अत्याचार प्रकरणी महिला चौकशी अधिकारी नेमा- पीडिताच्या आईची मागणी

पीएम नोट सामान्य रुग्णालय ते रामानंदनगर पोलीस स्टेशन एक महिन्याचा प्रवासात

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – तांबापुर येथील अल्पवयीन मुस्कान शाह हिला रामेश्वर नगर येथील विशाल भोई मुलाने फूस लावून पळविले होते व दुसऱ्या दिवशी त्या मुस्कान शाह चे प्रेत मेहरूण तलावात आढळून आले होते. सदर प्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२० प्रमाणे ३६३,३०६ व पोकसो १२ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
पोस्ट मॉरटम रिपोर्टचा प्रवास अद्याप सुरूच
२० जुलै रोजी ४ डॉक्टरांच्या समितीने मुस्कान चे पोस्टमार्टम केले होते व त्या पोस्टमार्टम रिपोर्ट वरून सदर गुन्ह्यात कलम वाढवण्यात येतील असे चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनी फिर्यादी व सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार ८ ऑगस्ट रोजी चौकशी अधिकारी सपोनि राऊत यांची भेट घेतली असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की पोस्टमार्टम रिपोर्ट रेडी आहे आज किंवा उद्या त्यानुसार पुढील कारवाई होईल परंतु दुर्दैव असे की १८ ऑगस्ट पर्यंत सदर पीएम रिपोर्ट हा शासकीय रुग्णालय जळगाव येथे धूळ खात पडलेला आहे परंतु चौकशी अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेतलेला नाही. डॉक्टरांनी वारंवार फोन करून सुद्धा सदर अहवाल पोलिसांनी घेऊन न गेल्याने मुस्कान ला न्याय मिळत नाही.
महिला अधिकारीही चौकशी अधीकारी म्हणून नियुक्ती करा
आज १८ ऑगस्ट रोजी मुस्कान ची आई फिर्यादी सुफीया बी, वडील भिकन शाह, मामा आसिफ शाह,मावशी शमीम शाह, शाह बिरादरीचे अनिस शाह व मानियार बिरादरीचे फारुक शेख यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करा व एक महिना होत आला तरी चौकशी अधिकारी पीएम रिपोर्ट घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने सदर प्रकरणी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली जात नाही म्हणून त्वरित सदर आरोपीवर ३७६,३२३,३२४ व पोकसो कलम ४ व ८ लावण्यात यावे व पुनःश्च त्याची पोलीस कोठडी घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. सदर निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.
त्वरित कारवाई करा लेखी आदेश
सहाय्यक पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी त्वरित पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी असे लेखी आदेश दिलेले आहे.

जळगावात काल भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पत्रकार परिषदेत जळगांव येथील अत्याचार पीडित मुलींबाबत आवाज उठविला परंतु त्यामध्ये एका अल्पसंख्यांक समाजाची व झोपडपट्टीत राहणारी मुस्कान शाह चा विसर पडला की फक्त राजकीय स्टंटबाजी करण्यात आली अशी खंत फारुक शेख यांनी व्यक्त केलेली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here