शहादा (विजय पाटील) – तालुक्यातील सावळदा येथील रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार समोर आला आहे. येथील एका लाभार्थ्याला रेशन देण्यास रेशन दुकानदाराने स्पष्ट नकार दिला आहे. कितीही तक्रार केली तरी रेशन मिळणार नाही. या पद्धतीचा मनमानी कारभार रेशन दुकानदाराने चालवला आहे.
कोरोना महामारीच्या संकटात त्रस्त असलेल्या जनतेला शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा रेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यातून कुणाचीही उपासमार होऊ नये हे शासनाचे धोरण आहे. परंतु काही रेशन दुकानदार आपला मनमानी कारभार करून काही लोकांवरती अन्याय करतांना दिसून येत आहेत. आधीच कामधंदा नसलेली जनता त्रस्त असून त्यांना जर त्यांच्या हक्काचे रेशन मिळाले नाही तर त्यांनी न्याय मागावा तरी कुठे? अशीच अवस्था सावळदा येथील एका लाभार्थ्याची झाली आहे.
सुमित युवराज गिरासे या लाभार्थ्याने अनेक वेळा लेखी तक्रार करून देखील पुरवठा विभाग शहादा यांच्या कडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर लाभार्थ्याने ऑनलाइन तक्रार दाखल केलेली आहे. लाभार्थी हा दहा वर्षापासून प्राधान्य कुटुंबातील असून त्यांना दरमहा १० किलो गहू व १० किलो तांदूळ ५० रुपये दराने मिळाला पाहिजे परंतू रेशन दुकानदार धान्य न देता दमदाटी करतांना दिसून येत आहे.
वारंवार तक्रार करून देखील सोयिस्कररित्या प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
कार्यवाही होण्यासाठी विलंब होण्याचे कारण विचारले असता तपास अधिकारी उपलब्ध नसल्याची माहिती मिळते.तरी या प्रकरणाकडे तहसीलदार शहादा व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व न्याय द्यावा असे निवेदन लाभार्थ्याने दिले आहे.









