म्यानमारमध्ये भूकंपबळींची संख्या दोन हजाराच्यावर, साडेतीन हजार लोक जखमी

भूकंप

नेप्यिडॉ (वृत्तसंस्था) : म्यानमार व थायलंडमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये असल्याने या देशात मोठी जीवित व वित्तहानी झाली. शेकडो इमारती कोसळल्या आहेत, हजारो घरे ढासळली आहेत. या भूकंपानंतर बाधित परिसरात बचाव मोहिमा सुरू आहेत. बचाव पथकातील हजारो कर्मचारी व लष्कराचे जवान गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत शेकडो लोकांना त्यांनी डेब्रिज खालून सुखरूप बाहेर काढले. तसेच अनेक मृतदेह देखील बाहेर काढले आहेत.

 

म्यानमारमधील लष्करी सरकारने सांगितले आहे की, या भूकंपात १,७०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३,५१४ नागरिक जखमी झाले आहेत, तर १५० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मात्र, तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, या भूकंपात २,०२८ जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्या ३,६०० हून अधिक आहे.

म्यानमारमधील मंडाले या दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहरात रस्त्यांवर कुजलेल्या मृतदेहांचा खच पडला असून, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. येथील भूकंपबळींचा आकडा आता १७०० वर गेला असून, ३४०० जण गाडले गेले आहेत. भूकंपाला दोन दिवस उलटले तरी स्वयंसेवक अजूनही जिवंत नागरिक सापडण्याच्या आशेने मातीचे ढिगारे हटविण्यात व्यस्त आहेत.शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडालेजवळ आल्याने अनेक इमारती कोसळल्या आणि शहरातील विमानतळासारख्या अन्य पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडले शहरातील ग्रेट वॉल हॉटेलच्या मलब्यातून एका महिलेला सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. तीन दिवसानंतर कोणाल तरी जिंवत वाचवण्यात यश मिळणे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. म्यानमारमधील चिनी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती स्थिर आहे. भूकंप केंद्र मांडले शहराच्या जवळ असल्याने यामुळे थायलंडसह अनेक शेजारील देशांमध्येही या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. थायलंडची राजधानी बँकॉक आणि इतर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मान्यमारमध्ये गृहयुद्धामुळे अनेक समस्या आहेत. याचवेळी या भूकंपामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या आपत्तीत सुमारे 23 हजाराहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. भारतासह अनेक देश आणि संयुक्त राष्ट्र (UN) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी बचाव पथके जागतिक पातळीवर कार्य करत आहेत. नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य केले जात आहे.

भारताचे ‘ऑपरेशन ब्रह्म’
भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here