पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : नारायणगाव वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या असून, चोरट्यांकडून मु्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अभंग वस्ती येथे राहणाऱ्या चंद्रिका कुमार रामचंद्र महातो वय ३० वर्षे धंदा मजुरी या वारूळवाडी येथील स्मशानभूमी जवळील पुलावरून शनिवार दि. २९ रोजी दुपारी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने तंबाखू आहे का असे विचारले? तर दुसऱ्याने फिर्यादीच्या गळ्यातील दुर्गा मातेचे चित्र असलेले सोन्याचे पदक हिसकावून घेऊन पुलाखालून नदिपात्रात पळून गेला. या आशयाची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासून शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय २१ वर्ष राहणार पिंपळगाव खडकी, तालुका आंबेगाव) आणि तेजस बबन शेळके (वय २१ वर्षे रा. नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर) यांना बेड्या ठोकल्या चोरट्यांकडून दहा हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पेंडल हस्तगत केले.
ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांचे आदेशानुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील व विनायक धडस, हवालदार संतोष कोकणे, आदिनाथ लोखंडे, सत्यम केळकर, सुभाष थोरात, सोमनाथ डोके, महिला पोलीस शिपाई ललिता किरवे, सोनाली रघतवाण, शुभांगी दरवडे, लोकल क्राईम ब्रँच चे हवालदार अक्षय नवले, दीपक साबळे, संदीप वारे आदींनी केली.







