जळगाव (संपादक सुनिल पाटील) : रात्रीच्या सुमारास शहरातील नशेमन कॉलनीतील एका घरातून दोन लाख रुपयांचे तीन महागडे मोबाईल चोरट्याने लांबविले होते. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवित त्या अल्पवयीन चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तीन मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे की, शहरातील नशेमन कॉलनीतील राहिवासी तन्वीर मजहर पटेल यांच्या घरात दि. १८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने प्रवेश केला. घरातून २ लाख रुपये किंमतीचे तीन महागडे मोबाईल चोरुन नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ कार्यवाही करत गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ किरण पाटील, छगन तायडे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, योगेश बारी, योगेश घुगे यांचे पथक तयार केले.
पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एक अल्पवयीन मुलगा संशयास्परित्या फिरतांना दिसला. त्यानुसार पथकाने त्या मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने मोबाईल लांबविल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले तीन मोबाईल देखील काढून दिले.







