धरणगाव (तालुका प्रतिनिधी विनोद पाटील) : तालुक्यातील म्हसदी येथील रहिवासी व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या यूट्यूब चॅनेल चे एक लाख फॉलोवर्स पूर्ण झाल्याने अमेरिकेतील यूट्यूबच्या मुख्यालयाने त्यांना सिल्वर बटन पुरस्कार पाठवला आहे.
मी हे चॅनेल केवळ विद्यार्थी व शेतकरी बांधव यांच्यासाठी सुरू केले होते,या पुरस्कारामुळे मला आनंद झाला असून जास्तीत जास्त लोकांनी या चॅनेल वरील माहितीचा लाभ घ्यावा.
– नितीनकुमार देवरे
नितीनकुमार देवरे यांनी सन २०१७ मध्ये ग्रामीण भागातील विद्याथ्यासाठी सदर चॅनेल सुरू केले होते.आपली शासकीय नोकरी सांभाळून ते या चॅनेल च्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षाबाबत माहिती व मार्गदर्शन करतात.तसेच शेतकरी बांधवांसाठी विविध योजनांची माहिती देखील देत असतात.तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही ते करतात.या चॅनेल मुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विदयार्थ्यांना खूप फायदा होत असून शेतकरी बांधवाना देखील आपल्या ७/१२ संबंधित समस्यांना उत्तरे मिळतात.ग्रामीण भागासाठी हे चॅनेल उत्तम माहितीचा स्रोत ठरले आहे.या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







