सावदा नगरपालिकेतील साफसफाई ठेकेदाराविरुद्ध तक्रार : ताजुशशरीया नगरातील रहिवाशांचा आक्रोश

सावदा

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : येथील ताजुशशरीया नगरातील रहिवाशांनी नगरपालिकेच्या साफसफाई ठेकेदाराविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. ठेकेदाराकडून नियमित साफसफाई आणि गटार स्वच्छता होत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यासंदर्भात ठेकेदाराचे बिल थांबवून ठेका रद्द करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

ताजुशशरीया नगरातील रहिवासी शेख अनिस शेख इब्राहिम यांनी दिनांक 03 जून 2025 रोजी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार नोंदवली. यावेळी त्यांनी ठेकेदाराकडून साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचे सांगितले. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला बोलावून चौकशी केली असता, ठेकेदाराने उलट शेख अनिस यांच्यावर कर्मचाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि मारण्याची धमकी देण्याचे खोटे आरोप केले. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रहिवाशांचे म्हणणे आहे की, ठेकेदाराकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगून दोन-तीन दिवसांनी साफसफाईचे आश्वासन दिले जाते, परंतु त्यानंतरही कर्मचारी पाठवले जात नाहीत. याउलट, ठेकेदार नागरिकांना धमकावत असून, “आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, तुमच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करू,” अशा धमक्या देत आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, ठेकेदाराचा हेतू तक्रारी दाबण्याचा आहे, जेणेकरून त्यांच्याविरुद्ध कोणी आवाज उठवू नये. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश गजानन वानखेडे,शेख अनिस शेख इब्राहिम, पत्रकार फरीद शेख, शेख मुख्तार, अजहर खान, प्रवीण पाटील, मोईन शेख हसन, शेख चांद शेख शब्बीर, शेख अफसर शेख अख्तर, मोहम्मद गौस मोमिन, साबीर कुरैशी, शेख आदिल शेख सलीम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकारामुळे ताजुशशरीया नगरात अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. गटारी तुंबल्याने आणि कचऱ्याचे ढीग साचल्याने साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “लाखो रुपयांचा ठेका घेऊनही दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदाराला जबाब विचारण्याचा अधिकार नागरिकांना नाही का?” यासोबतच, नगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here