फैजपूरात हॉटेल बिलाच्या वादातून हिंसक हाणामारी; तिघे गंभीर जखमी, चौघांवर गुन्हा

hanamari
प्रतीकात्मक चित्र

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : फैजपूर येथील सुभाष चौकात मंगळवारी (दि. १०) रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलमधील बिलाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेतले. या घटनेत हॉटेल व्यवस्थापक आणि त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्टा, लोखंडी रॉड आणि चाकूसह बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तिघे गंभीर जखमी झाले. फैजपूर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

यावल रोडवरील हॉटेल तृभावी येथे मंगळवारी दुपारी बिलावरून वाद झाला होता. यावेळी हॉटेल व्यवस्थापक सुमित ऊर्फ छोटू मार्तंड साळुंके (रा. फैजपूर) यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याबाबत सुमित यांनी फोनवरून जाब विचारल्यावर वाद अधिक तीव्र झाला. रात्री सुभाष चौकात आरोपींनी सुमित साळुंके आणि त्यांचे मित्र अमोल तायडे व सागर भालेराव यांना गाठले. आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू आणि गावठी कट्ट्याचा वापर करत तिघांना मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सुमित साळुंके यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांनी शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख आणि आकिब शेख यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. शेख आरिफ, शाहरुख शेख आणि आसिफ शेख यांना अटक करण्यात आली असून, आकिब शेख अद्याप फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.नि. रामेश्वर मोताळे, पीएसआय नीरज बोकील व विनोद गभाने करत आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here