अहमदाबाद (वृत्तसंस्था) : येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे. आज (दि.१२ जून) दुपारी येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान मेघानीनगर भागात कोसळलं. घटनास्थळी आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या होत्या. धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांतच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या विमानात असलेल्या २४२ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते.
विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त होते आहे. विमानतळाजवळ सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.
विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही.







