पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) : तालुक्यातील गार्डी-भाळवणी, जैनवाडी या गावांना जोडणाऱ्या कासाळ ओढ्यावरील बंधार्याचा भरावा वाहून गेल्याने गेली अनेक वर्षापासून तिन्ही गावांचा संपर्क तुटला होता. यानंतर पर्यायी ओढ्यातील रस्त्याचा वापर शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून केला जात होता. मात्र पावसाळा सुरू होण्याअगोदरच पडत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली आहे.
यामुळे पर्यायी रस्त्यावर सुमारे तीन ते चार फूट पाणी वाहत असताना येथील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून ओढ्यातील पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पाण्यातून मार्ग काढताना वृद्धाचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
याबाबतची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी गार्डी येथील ओढ्यावरील रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करू नये दखल घेतली जात नसल्याच्या व्यथा मांडल्या.

या समस्येकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून शाळा सुरू होण्याच्या अगोदर रस्त्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे, तालुकाप्रमुख बंडू घोडके, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, राजाभाऊ पवार, शांताराम यादव, सोमनाथ अनपट, अनिल पवार, संभाजी चव्हाण, गजेंद्र बोडरे उपस्थित होते.







