जळगाव (संपादक सुनिल पाटील) : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताने दहशतवादाविरोधात उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरोधातील लढाईतील एक निर्णायक वळण आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रखर देशाभिमानी वक्ते दीपक करंजीकर यांनी केले. ॲड.एस.ए. बाहेती कॉलेज व जळगाव जिल्हा माहेश्वरी युवा संघटन यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.
आज (दि.२१) सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ॲड.एस.ए. बाहेती कॉलेज व जळगाव जिल्हा माहेश्वरी युवा संघटनतर्फे ‘ऑपरेशन सिंदूर – भारत बदलला आहे’ या विषयावर दीपक करंजीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर शहराचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा, ॲड.एस.ए. बाहेती कॉलेजचे अध्यक्ष ॲड.रोहन बाहेती, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, माजी नगरसेविका ॲड.शुचिता अतुलसिंह हाडा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या संरक्षण धोरणात एक महत्त्वाचा बदल घडवून आणला आहे. यापुढे, दहशतवादाला थारा न देण्याचा आणि दहशतवाद्यांना त्यांच्याच हद्दीत जाऊन संपवण्याचा निर्धार व्यक्त करत यापुढे भारताच्या भूमीवर दहशतवादाला थारा देणार नसल्याचे, आपला परंपरागत शत्रू व दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारताने स्पष्ट इशारा दिला आहे.
आपल्या व्याख्यानात ऑपरेशन सिंदूर संदर्भात भूराजकीय संदर्भ, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बदललेल्या धोरणाचा परिणाम तसेच यामुळे देशाच्या आर्थिक धोरणांवर झालेल्या परिणांमाविषयी सविस्तर विवेचन केले. व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी ॲड.एस.ए. बाहेती कॉलेज व जळगाव जिल्हा माहेश्वरी युवा संघटनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.







