सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : दिनांक 2 जुलै 2025, बुधवार रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे ट्रान्सपोर्ट संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कठोर सूचना देत अनधिकृत व्यवसाय आणि वाहतूक कोंडीवर कारवाईचा इशारा दिला.
सावदा-फैजपूर रोड हा ट्रान्सपोर्ट नगर म्हणून ओळखला जातो. या परिसरात शाळा, महाविद्यालये, गुरुकुल आणि एमआयडीसी असल्याने वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत येथे अनेक अपघात घडले असून, जीवितहानीची शक्यताही वाढली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले, “अनधिकृत ट्रान्सपोर्ट व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाईल. परवाना नसलेल्या चालकांवर दंडात्मक कारवाई होईल आणि भविष्यातील कोणत्याही दुर्घटनेस संबंधित चालक जबाबदार राहतील.”
पाटील यांनी ट्रान्सपोर्ट चालकांना उद्देशून सांगितले, “पार्किंगच्या नावाखाली 100 रुपये घेण्याची प्रथा बंद करा. रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणे बेकायदेशीर आहे. सावदा-फैजपूर रोडवर केळीचा वेस्टेज पडलेला दिसतो, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो. ट्रान्सपोर्ट समोर कचरा आढळल्यास कलम 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. चालकांनी स्वतःहून खर्च करून रस्ते स्वच्छ ठेवावेत.”
डायमंड ट्रान्सपोर्टचे मालक हाजी हारुन शेठ यांनी बैठकीत सांगितले, ज्यांच्याकडे ट्रक उभ्या राहायला जागा नाही असे “काही चालक आमच्या ट्रान्सपोर्ट समोर वाहने उभी करतात, ज्यामुळे आम्हालाही त्रास होतो.” खंडेलवाल ट्रान्सपोर्टचे मालक मयूर खंडेलवाल यांनीही याला पाठिंबा देत म्हटले, “कठोर कारवाईशिवाय सुधारणा होणार नाही.”
या बैठकीने सावदा शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनागोंदी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रकाश टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या कठोर सूचनांमुळे ट्रान्सपोर्ट चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सावदा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.







