सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : सावदा मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सावदा येथील तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी याला सावदा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 71/2023 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 464, 465, 467, 468, 471 आणि 474 अन्वये गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांवरही पोलिसांचे लक्ष आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रविंद्र वाणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर जवळपास एक वर्ष फरार होता. सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, अमोल गर्जे, पोलीस हवालदार उमेश पाटील, निलेश बाविस्कर, पोलिस कॉन्स्टेबल मयूर पाटील आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल गीता कदम यांनी रसलपूर येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 10 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करत आहेत.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांनी आर्थिक ऐपत नसलेल्या व्यक्तींना मोठ्या रकमांचे कर्ज वाटप करून संस्थेला डबघाईस आणले. काही संचालकांनी कर्जदारांचे जामीनदार म्हणून काम केले, तसेच त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या रकमांचे कर्ज मंजूर केले. याशिवाय, काही कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांवरील बोजा कमी करण्यासाठी बनावट दाखले तयार केल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकारात संचालकांचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सावदा मर्चंट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवीदारांना सूचित करण्यात येते की, ज्यांचे पैसे बँकेने परत केले नाहीत, त्यांनी सावदा पोलीस स्टेशनशी तातडीने संपर्क साधावा. पोलिसांनी या प्रकरणात पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावदा पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई केली आहे. फरार आरोपीला अटक करून पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवली असून, या प्रकरणातील इतर दोषींवरही कारवाई करण्यासाठी तपास सुरू आहे.







