जळगाव (संपादक सुनिल पाटील) : वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव फाट्याजवळील पुलाखाली एका तरुणास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. रवींद्र चौधरी यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर पो. नि. संदीप पाटील यांच्या आदेशाने पोलीस पथकाने या ठिकाणी धाव घेतली. पंचांसह छापा टाकल्यावर, पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
विचारपूस केली असता, त्याचे नाव केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर, वरणगाव, ता. भुसावळ) असे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला सुमारे २५ हजारांचा गावठी कट्टा व २ हजार ५०० रुपयांचे ५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याला वरणगाव पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचे काळजीपूर्वक लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
अधिक चौकशी केली असता केशव विरोधात यापूर्वी वरणगाव पोलिसात गु.र.नं.२०/२०१५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व ३(५) प्रमाणे दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल असून, गुन्हा घडल्यानंतर ६ महिने तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यास वरील मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थागुशा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि रवि नरवाडे, पोह गोपाळ गव्हाळे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोअं रविंद्र चौधरी या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.







