मोरपिसांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वनविभागाने केला पर्दाफाश

तस्करी

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या पिसांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीवर पुणे वनविभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली आहे. नरपतगिरी चौक सोमवार पेठ परिसरात उत्तरप्रदेशातून आलेल्या ११ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील तब्बल ४०० ते ५०० किलो वजनाची मोरपिसे आणि त्यांच्यापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू जप्त केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांतील ही सर्वांत मोठी कारवाई ठरली असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी श्रावण महिना, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात घर सजावटीसाठी मोरपिसांना मोठी मागणी असते. ही संधी साधून मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची अवैधरित्या वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती पुणे वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या फिरत्या पथकाने नरपतगिरी चौक येथे कारवाई केली. तिथे विक्रीस आणलेली मोरपिसे जप्त करून आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी संत गाडगेबाबा धर्मशाळेत मोठ्या प्रमाणावर मोरपिसांचा साठा केला असल्याची कबुली दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली असता, तेथे सुमारे ५०० किलो वजनाची मोरपिसे आणि शोभेच्या वस्तू सापडल्या. हा मुद्देमाल जप्त करून ११ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here