पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून परळी तालुक्यातील प्रस्तावित गावातील संपादन प्रक्रियेला आलेल्या अधिकरी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी एकजूट होत तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीने तालुक्यात संपादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. कृषीदिनी राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तात्काळ रद्द करावा यासाठी परळी तालुक्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी तळेगाव याठिकाणी रास्तारोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला होता.
राज्यात शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने, पोलिसी बळाची भीती दाखवत सीमांकन व संपादन करण्याच्या प्रयत्न शासन व प्रशासन करत असून शेतकरी आता या गोष्टीला बळी न पडता शक्तीपीठ महामार्ग विरोधात एकवटला आहे. परळी तालुक्यातील ज्या गाव शिवारातून हा महामार्ग प्रस्तावित असून या महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली एकत्र येत तळेगाव या ठिकाणी कृषिदिनी रास्ता रोको करत शासनाचा निषेध करत या महामार्गास विरोध दर्शविला. शनिवार दि 5 रोजी या प्रस्तावित महामार्गाच्या संपादन प्रक्रिया कामी भोपळा, डाबी, कण्हेरवाडी तांडा या ठिकाणी आलेल्या अधिकारी आणि पोलिसांना शेतकऱ्यांनी एकजूट होत जमिनीची मोजदात करण्यास मज्जाव केला. कोणत्याही परिस्थितीत वडिलोपार्जित कुटूंबाचे उपजीविकेचे साधन असलेली शेती या महामार्गास द्यायची नाही असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी कण्हेरवाडी तांडा या ठिकाणी झालेली बैठकीत करण्यात आला आहे. या बैठकीस किसान सभेचे एड.अजय बुरांडे यांच्या सह व्यंकट ढाकणे, कॉ.प्रकाश चव्हाण, राहुल मुंडे, सुग्रीव फुंदे, तळेगाव येथील माणिक सोनवणे, गणेश सोनवणे, ओम मुंडे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान या मोजणी प्रसंगी उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अरविंद लाटकर यांना शेतकऱ्यांनी विरोध करत परतावून लावले. लाटकर यांनी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा पंचनामा केला आहे.







