जळगाव (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्यात जप्त केलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी एक लाख पंचवीस हजारांची लाचेची मागणी
करुन खाजगी पंटरमार्फत ती स्वीकारणाऱ्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे यांच्यासह त्यांचा लिपिक अतुल अरुण सानप वय ३२ रा. मेहरुण या दोघांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे . जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुक्रवारी २१ रोजी दुपारी पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदार यांचा वाळूचा व्यवसाय असून, त्यांच्या गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचा परवाना आहे, मात्र त्यांचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील कार्यालयातील पथकाने पकडले होते. हे ट्रक औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले होते. हे दोन्ही ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्यावतीने त्यांचा लिपीक अतुल अरुण सानप याने तक्रारदारास दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले. या लाचेची रक्कम अतुल सानप यांच्या खासगी पंटरने स्वीकारली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल अशोक अहिरे, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहे.







