श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरात ग्रीन डे उत्साहात साजरा

ग्रीन डे

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : कुऱ्हे पानाचे येथील श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरात मंगळवार दि.२९ रोजी ग्रीन डे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाची पालेभाजी, फळांची वेशभूषा परिधान केली होती. तसेच हिरवे खाद्यपदार्थ डब्यात आणले होते.

विविध प्रकारची प्राणी पक्षांची चित्रे, फळे, फुले व हिरव्या रंगाची फुगे असे सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. विद्यार्थ्यांनी या वेळी हिरवाईने नटलेल्या वसुंधरेविषयी प्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी हिरव्या नागवेलीच्या, पोथीच्या , केळीच्या पानावर काकडी, कारले, कडीपत्ता, लिंबू, भोपळा, ढेंमसी, दुडीचे फुले, हिरवी मिरची, पालक, मेथी, पोका, भेंडी, करटुले, सारख्या हिरव्या भाज्या, विविध फळे, फुले आणली होती. झाडांचे मुखवटे, कडू निंबाचे पाने परिधान केले होते. हिरवे फुगे घेऊन व हिरवेच पोशाख परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे शाळेचे वातावरण हिरव्या रंगात न्हाऊन निघाले होते. तसेच शिक्षिकांनीही हिरव्याच रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. हिरवीगार वनसंपदा, निसर्ग, वसुंधरा व झाडांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, लहान मुलांसह सर्वांनीच आहारात हिरव्या पालेभाज्या खाव्यात हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा भावना बडगुजर यांनी सांगितले.
माजी जि प सदस्या शशिकला बडगुजर यांनी पिंपळाच्या हिरव्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या गणपतीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा भावना बडगुजर, माजी जि प सदस्या शशिकला बडगुजर, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता बारी उपस्थित होत्या. सुवर्णा महाजन, आरती निकम, तेजल कोल्हे, ललीता बाविस्कर, योगिता व्यवहारे, प्रीती वराडे आदींनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here