जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) । दिनांक 29/8/रोजी रात्री च्या सुमारास तालुक्यातील दहिगावच्या बाहेर विरावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खारवा शिवारात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून दोन तरुणांनी हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. हत्या केल्यानंतर दोघे तरुण स्वतः यावल पोलिस ठाण्यात हजर झाले.
तसेच त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक रवाना झाले. त्यांनी मृतदेह यावल रुग्णालयात नेला. दहिगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रवींद्र कोळी (वय १९) हे यावल पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजता दुचाकीने (एम. एच १९ इएफ. ३८५९) आले. त्यांनी ठाणे अंमलदार हेमंत सांगळे यांच्याकडे दहिगावच्या बाहेरील विरावली रस्त्यावर खारवा शिवारात इम्रान युनूस पटेल (क्य. २१, रा. सुरेश आबा नगर, दहिगाव) याची हत्या केल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, वासुदेव मराठे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला बोलावले. रात्री दहा वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेलेनाही.







