वंचित आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मुलावर हल्ला; समर्थकांनी आरोपीचे वाहन जाळले

वंचित आघाडी

अकोला (प्रतिनिधी) । शहरात शुक्रवारी (दि.५) दुपारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांचा मुलगा यश पातोडे याच्यावर चाकूने ७ वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पातोडे यांच्या समर्थकांनी आरोपीचे वाहन जाळल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

ही घटना खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सूरज आत्माराम इंगोले (वय ३१) याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांचा मुलगा यश पातोडे (वय २४) याच्या घरात शिरून त्याच्यावर चाकूने ५ ते ७ वेळा वार केले. या हल्ल्यात यश गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती शहरात पसरताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पातोडे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी आरोपी सूरज इंगोलेच्या घरासमोर उभी असलेली ओमनी चारचाकी गाडी फोडून पेटवून दिली. त्यांनी इंगोले यांच्या घरावरही हल्ला केला. या हल्ल्यात सूरज इंगोले देखील जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला आहे.
माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खदान पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here