भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) । तालुक्यातील वरणगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे बोहर्डी खुर्द शिवारात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीवर छापा टाकला. झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या दारू भट्टी उद्ध्वस्त करत पोलिसांनी एकूण ४३ हजार २५० रुपये किमतीचा अवैध दारू तयार करण्याचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पोलिसांनी रविंद्र ज्ञानदेव गोपाळ (वय ४०, रा. बोहर्डी बु., ता. भुसावळ) याला अटक केली आहे. सपोनि अमितकुमार बागुल यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बोहर्डी खुर्द शिवारातील हरताळा रोडजवळील नाल्याच्या काठावर झाडाझुडपात रविंद्र गोपाळ नावाचा इसम गावठी हातभट्टीच्या साहाय्याने बेकायदेशीर रित्या दारू तयार करत आहे.
सदर माहिती खात्रीशीर असल्यामुळे सपोनि बागुल यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशांत ठाकुर, यासीन पिंजारी, मनोज म्हस्के,चालक पोलिस उपनिरीक्षक इस्माइल शेख,तसेच दोन पंचांसह पोलिसांची टीम सरकारी वाहनासह घटनास्थळी रवाना झाली.
पोलिस पथकाने वाहन रस्त्यालगत उभे करून काही अंतर पायी चालत जाऊन नाल्याजवळ पोहोचले.बातमी प्रमाणे ठिकाणाची दुरून खात्री घेतली असता, झाडाझुडपात एका चुलीवर दोन पत्र्याचे ड्रम ठेवून त्यात रसायन ढवळताना एक इसम दिसून आला.पोलिसांनी लगेच छापा टाकून त्याला पकडले.पंचासमक्ष विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव रविंद्र ज्ञानदेव गोपाळ असल्याचे सांगितले.







