पाचोरा – भडगाव तालुक्यात अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; सरकारने त्वरित मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पाचोरा - भडगाव

भडगाव (तालुका प्रतिनिधी अमीन पिंजारी) । भडगाव आणि पाचोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके जलमय झाली असून, अनेक ठिकाणी कापूस, सोयाबीन, मका, उडीद, मूग यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतात पाणी साचल्यामुळे पीक कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या हंगामासाठी घेतलेले कर्ज आणि घातलेली मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे. काही गावांमध्ये तर नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीच्या आसपासची जमीन शेतकऱ्यांची विहीर वाहून गेली आहे. परिणामी, येत्या रब्बी हंगामावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली असून, तलाठी आणि कृषी अधिकारी गावोगावी जाऊन पंचनामे करत आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. “पावसामुळे संपूर्ण पीक हातून गेलंय. आता घर चालवायचं कसं, याची चिंता लागून राहिली आहे . सरकारने त्वरित मदतीची घोषणा करावी, अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरी वर्गांकडून मोठ्या प्रमाणातून होत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मदतीसंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता, मदतीत विलंब झाल्यास शेतकऱ्यांचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाचोरा - भडगाव

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here