लातूर (प्रतिनिधी) । जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात धारदार शस्त्राने पिता-पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे गावात भीतीचं वातावरण असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेली ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर (२०) हे रोजच्याप्रमाणे संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या चेहऱ्यावर, तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करत दोघांना ठार केले आहे. नंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह शेतातून उचलून ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ फेकून दिले.
ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आली. सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रुद्धा गावात दोन जीव घेतलेल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.





