डहाणूत अवैध खैर तोडीवर धडक कारवाई; दीड लाखांचा साठा जप्त

कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत वनसंपत्तीचे संरक्षण करण्याचा चोख ‘धडा’ दिला आहे. डहाणू वनपरिक्षेत्र उधवा आणि धानिवरी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दापचरी परिसरात धडक कारवाई करत अवैध खैर जातीच्या लाकडाचा साठा जप्त केला आहे.

सिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई–अहमदाबाद हायवेलगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळील भागात मोठ्या प्रमाणात खैर जातीच्या झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली असल्याचे समोर आले. त्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संपूर्ण पथकासह त्या ठिकाणी शोधमोहीम राबवली.
या शोधमोहीमेदरम्यान अंदाजे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा मिळाला. हा साठा जवळपास तीन पिकअप वाहनांच्या क्षमतेइतका मोठा होता. या लाकडाचा संपूर्ण माल डहाणू वनपरिक्षेत्र कासा येथील शासकीय काष्ठविक्री आगर, भराड येथे जमा करण्यात आला आहे.
या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर, वनपाल विजय पाटील व योगेश कुलकर्णी तसेच वनरक्षक संजू भुसारा, सुनील पवार, प्रवीण व दिनेश वाळू, किरण विल्हात, गुरुनाथ गांगोडे, राजेश बोबा, भिवा दळवी, लक्षी गोरखाना, लक्ष्मण थोरात, बंधु पराड, लक्ष्मण दळवी, कान्हा वेडगा आणि राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here