पालघर (उपसंपादक रामदास पाटील) । दि.५ नोव्हेंबर बुधवारी फ्रेदून फाउंडेशन तर्फे फ्रेदून समूहाचे संस्थापक दिवंगत श्री. नरिमन बमनशाह मेधोरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
या अंतर्गत, “मोफत अन्नदान सेवा केंद्र” याचा शुभारंभ पालघर स्थानक (पश्चिम) येथे करण्यात आला. दिवंगत श्री. नरिमन मेधोरा सरांचे स्वप्न पूर्ण करत सुरू करण्यात आलेले हे केंद्र २४ तास सर्वांसाठी खुले असून गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्याच दिवशी आयोजित भव्य रक्तदान व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २६५ बाटल्या रक्तदान करण्यात आले, ज्यात हिरानंदानी ब्लड बँक व महाराष्ट्र ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
महिलांसाठी विशेष राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी उपक्रमात, फ्रेदून समूह व रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले: स्तनाचा कर्करोग तपासणी: १३३ महिला सहभागी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी: ८९ महिला सहभागी हा संपूर्ण उपक्रम फ्रेदून समूहाच्या सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.
या प्रसंगी लक्ष्मण पवार यांनी संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व करत आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले. त्यांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि दिवंगत श्री. नरिमन बमनशाह मेधोरा यांच्या समाजसेवेच्या आणि मानवतेच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.









