यावल (सुरेश पाटील) – आज दिनांक 22 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. त्यामुळे धरणातून एक लाख १६ हजार १३२ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी सातत्याने वाढ होत आहे. दुपारी तापी नदीला मोठा पूर आल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला आलेला पुर पाहण्यासाठी भुसावळ शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.अनेकांनी या पाण्याचे जलपूजन केले. सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश वाहतुकीतीस मोठा आधार असलेला बऱ्हाणपूर-भुसावल यावल भुसावल महामार्गावरील असलेला तापी नदीवरील पुल वाहतूकीमुळे व्यस्त असतो. आज तापी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीवरील पुल व रहदारीबाबत दक्षता घेणेबाबत यातून सूचना देण्यात आली आहे. प्रसिध्दीपत्रकावर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची स्वाक्षरी आहे.








