जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) | शहरातील निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते जितेंद्र मराठे यांनी येत्या महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याची घोषणा केली आहे. मराठे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या उमेदवारीबाबत अधिकृत माहिती दिली.
जितेंद्र मराठे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक समाजकार्यात सक्रिय राहिले असून युवकांना एकत्र आणणे, परिसरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते आणि स्वच्छता यासाठी सतत पाठपुरावा करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. “जनतेच्या थेट आशीर्वादावर माझा विश्वास आहे. कोणत्याही पक्षाचा आधार न घेता, थेट लोकांच्या ताकदीने आणि मतांवर मी ही निवडणूक लढविणार,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणूक प्रचारात जनसंपर्क व घरपोच भेटींद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस आराखडा सादर करण्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार आराखडा सार्वजनिक करण्यात येणार आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात मराठे यांच्या अपक्ष उमेदवारीला विशेष महत्व दिले जात असून, त्यांच्या रिंगणात उतरल्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत शहरातील राजकीय समीकरणे अधिक रंगतील, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.







