- जगभरातील १००० हून अधिक साई मंदिरांमध्ये एकाच वेळी गुंजणार ‘साईनाथ स्तवन मंजिरी’
- शिर्डी महापरिक्रमा २०२६ ची घोषणा होणार
- महिलांना भगव्या रंगाच्या पेहरावात उपस्थित राहण्याचे सौ. माधुरीताई शिंदेंचे आवाहन
शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) । श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने साईचरणी एका ऐतिहासिक सुवर्णक्षणाची नोंद होणार आहे. विश्वशांतीसाठी आयोजित भव्य-दिव्य ‘विश्व श्री साई स्पंदन सोहळा’ आज, शनिवारी (१० जानेवारी) सायंकाळी ५ वाजता शिर्डीत संपन्न होत आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त साईभक्तांनी व महिला भगिनींनी उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण सौ. माधुरीताई शिंदे यांनी दिले आहे.
जगभरातील भक्तीचे एकच स्पंदन
या सोहळ्याचे स्वरूप केवळ स्थानिक नसून जागतिक आहे. जगभरातील १००० हून अधिक साई मंदिरांमध्ये एकाच वेळी, एकाच स्वरात ‘श्री साईनाथ स्तवन मंजिरी’चे सामुदायिक वाचन होणार आहे. या जागतिक उपक्रमाचे मुख्य केंद्रस्थान साईंची पावन नगरी शिर्डी असणार आहे. एका भव्य एलईडी स्क्रीनवर उपस्थितांना जगभरातील साई मंदिरांचे थेट दर्शन आणि तेथील भक्तीमय वातावरण अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
ऐतिहासिक शिर्डी महापरिक्रमेची घोषणा
याच कार्यक्रमात २०२६ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक शिर्डी महापरिक्रमेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. साईबाबांच्या कार्यात आणि आध्यात्मिक प्रवासात महिलांचा वाटा नेहमीच मोलाचा राहिला आहे. परिक्रमेमध्ये ७० टक्के सहभाग हा महिलांचा असतो, असे नमूद करत सौ. शिंदे यांनी या सोहळ्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सामुदायिक सेवेची अनोखी संधी
“सामुदायिक सेवेचे फळ हे वैयक्तिक सेवेपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. जगभरातील लाखो भक्तांशी एकाच वेळी जोडून घेणारा हा सोहळा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी सामुदायिक सेवा ठरेल,” अशा भावना माधुरीताई शिंदे यांनी व्यक्त केल्या. हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होणार असून, साईभक्तांसाठी ही एक अनोखी पर्वणीच आहे.
महिलांना विशेष आवाहन
या सोहळ्यासाठी उपस्थित राहताना महिलांनी शक्य असल्यास परिक्रमेप्रमाणेच भगव्या रंगाची साडी परिधान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत भगवा रंग हा त्याग, सामर्थ्य आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. दिनांक: शनिवार, १० जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजता, श्री साईबाबा सांस्कृतिक भवन, साईबाबा महाविद्यालय, नवीन शैक्षणिक संकुल, हेलिपॅड रोड, निमगाव, शिर्डी येथे होणा-या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी व महापरिक्रमेच्या नांदीसाठी जास्तीत जास्त साईभक्तांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.







