शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) । श्री साईबाबांच्या पावन नगरीत पुन्हा एकदा प्रामाणिकपणाचा एक आदर्श प्रसंग समोर आला आहे. साईबाबा मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या जनसेवा फाऊंडेशनच्या एका महिला कर्मचाऱ्याने सापडलेले ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत करून इमानदारीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.
श्री साईबाबा मंदिर परिसरात ‘जनसेवा फाऊंडेशन’ मार्फत नैसर्गिक अगरबत्ती आणि धूप विक्रीचे स्टॉल लावले जातात. या स्टॉलवर श्रीमती सुनीता कैलास वहाडणे या महिला कर्मचारी अत्यंत निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. आज काम करत असताना त्यांना मंदिर परिसरात एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले.
बाजारात या सोन्याच्या मंगळसूत्राची अंदाजे किंमत रु. ५०,०००/- इतकी होती. मात्र, श्रीमती सुनीता यांनी मनाचा कोणताही तोल ढळू न देता किंवा कोणताही मोह न ठेवता, तात्काळ हे मंगळसूत्र साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात प्रामाणिकपणे जमा केले.
साईभक्ताला मिळाले हरवलेले दागिने
संरक्षण विभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असता, हे मंगळसूत्र हैद्राबाद येथील साईभक्त श्री. व्यंकटेश प्रसाद यांचे असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक ती खातरजमा आणि पडताळणी केल्यानंतर संबंधित साईभक्ताला कार्यालयात बोलावून त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र सुरक्षितपणे परत करण्यात आले. हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर साईभक्ताने कर्मचाऱ्याचे मनापासून आभार मानले.
कर्मचाऱ्याचा यथोचित सन्मान
श्रीमती सुनीता वहाडणे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी आणि साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी सुनीता ताईंचे अभिनंदन केले.साईबाबांच्या शिकवणीनुसार ‘श्रद्धा आणि सबुरी’ सोबतच ‘प्रामाणिकपणा’ जपणाऱ्या सुनीता वहाडणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







