सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । येथील गाडेगाव रोडवर झालेल्या भीषण हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल १४ महिन्यांच्या प्रदीर्घ शोधानंतर बार्शी शहर पोलिसांनी परभणी येथून बेड्या ठोकल्या आहेत. रफिक अफजल शेख (रा. रहिम नगर, परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चालकाचे नाव आहे.
दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी गाडेगाव रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शांतीलाल उतरेश्वर बोराडे यांना एका भरधाव ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली होती. या अपघातात बोराडे यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक रफिक शेख कोणालाही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला होता. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वीच ट्रॅव्हल्स मालकाला अटक केली होती, मात्र चालक रफिक हा गेल्या १४ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बालाजी कुकडे यांनी विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील पोलीस नाईक संगप्पा मुळे यांनी परभणी येथे आपले गुप्त बातमीदार सक्रिय केले होते. आरोपी परभणीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने परभणी गाठून रफिक शेख याला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला या गुन्ह्यात अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गळगटे, पोलीस अंमलदार संगप्पा मुळे आणि लखन घाडगे यांचा समावेश होता







