लोण पिराचे येथे हजरत गैबन शहा बाबा व फकीरा बाबा यांचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

हजरत गैबन शहा बाबा

भडगाव (प्रतिनिधी अमीन पिंजारी) | तालुक्यातील लोन पिराचे येथे हजरत गैबन शहा बाबा व फकीरा बाबा यांचा वार्षिक यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. या यात्रेदरम्यान धार्मिक सलोखा व सामाजिक एक्याचे सुंदर दर्शन घडले.

दिनांक पाच रोजी सायंकाळी पुंजारी ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्या घरातून परंपरेनुसार सादर व संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या निनादात ही मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.
दिनांक सहा रोजी, शुक्रवारी, मुख्य यात्रा उत्सव पार पडला. यात्रेनिमित्त हजरत गैबन शहा बाबा व फकीरा बाबा यांच्या दर्ग्यावर भाविकांनी दर्शन घेत नवस फेडले. यावेळी दूर-दूरच्या भागातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या काळात फूल चादर चढवणे, दुवा मागणे, महाप्रसादाच्या आयोजन करणे असे धार्मिक विधी पार पडले.
लोण पिराचे हे गाव जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध असून या यात्रेसाठी जळगावसह दोन-तीन शेजारील जिल्ह्यांतून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. यात्रेमुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांच्या वतीने योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. या यात्रेमुळे धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. गावातील ग्रामपंचायत व सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here