राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; अवैध मद्यसाठ्यासह १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

अवैध मद्यसाठ्यासह

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील देवळी शिवार परिसरात मोठी कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यसाठ्यासह तब्बल १२ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून महागडी कार आणि प्रतिबंधित मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि नाशिक विभागाच्या उप आयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. निरीक्षक के. एन. गायकवाड यांना चाळीसगाव ते मालेगाव रस्त्याने अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देवळी शिवारात सापळा रचून एमएच-१८ सीएल ८३०३ क्रमांकाची मारुती सुझुकी अर्टिगा कार थांबवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि दमण येथे विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा आढळून आला. एकूण अंदाजे किंमत १२,९१,१०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सचिन भिकन पाचपुते (वय २७) आणि मिथुन महादू मोरे (वय ४०, दोघेही राहणार विंचूर, ता. जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई निरीक्षक के. एन. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, व्ही. बी. परदेशी आणि चालक एम. डी. पाटील यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here