कोल्हापूर (पश्चिम महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर नियाज जमादार) | करवीर, काळे आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीकाठच्या आणि विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी चोरणाऱ्या एका अट्टल टोळीला करवीर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० पाणी उपसा मोटारी, गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ३,५२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १६ मार्च २०२६ रोजी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीच्या मोटारींची विक्री करण्यासाठी काही तरुण पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून (क्रमांक MH-12-DS-9886) येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेल यशवंत जवळ सापळा रचून कार थांबवली. कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये तीन पाणी उपसा मोटारी आढळून आल्या. संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणी सुनील सुभाष जाधव (वय २८, रा. तासगाव, जि. सांगली), सूरज बाळू लोखंडे (वय २६, रा. रुकडी, जि. कोल्हापूर), सूरज संपत गुजले (वय २१, रा. रेणावी, जि. सांगली), हर्षद विकास पाटोळे (वय २५, रा. रेणावी, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले आहे.
हे आरोपी रात्रीच्या वेळी कुंभी आणि कासारी नदीकाठच्या शेतात जाऊन तेथील मोटारींची चोरी करत असत. चोरी केलेल्या मोटारी ते इंडिका कारच्या मागील सीटवर किंवा डिक्कीत लपवून नेऊन त्यांची विक्री करत असत. तपासादरम्यान करवीर, पन्हाळा आणि काळे पोलीस ठाण्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून २० पाणी उपसा मोटारी: यामध्ये किर्लोस्कर, टेक्समो, लक्ष्मी यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या ३ HP ते १५ HP क्षमतेच्या मोटारींचा समावेश आहे. तसेच एक पांढरी इंडिका कार आणि एक हिरो स्लेंडर प्लस मोटारसायकल व मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. न्यायालयाने आरोपींना २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.







