सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजे उजणी (माढा) परिसरात छापा टाकून तब्बल ३५ लाख ५९ हजार ५०० रुपये किमतीची ७१ किलो १९ ग्रॅम वजनाची हिरवी गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत एकाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उजणी (माढा) येथील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती कुर्डूवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतात अचानक छापा टाकला असता, तेथे गांजाची झाडे लावल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ सर्व झाडे उपटून जप्त केली. या प्रकरणी शेतकरी अभिमान विठ्ठल लोकरे (वय ५३ वर्ष, रा. उजणी (मा.), ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. ४०२/२०२६, NDPS Act १९८५ चे कलम ८ सी, २० अ (ii)क) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (करमाळा) अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकूळ, पोलीस उपनिरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस फौजदार रणदिवे, पोलीस अंमलदार शिंदे, हराळे, मोरे, मुलाणी, बागल, कुंभार व गात यांच्या पथकाने केली. अशा बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांवर पुढील काळातही अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिला आहे.







