
कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | नातेसंबंधाचा फायदा घेत आणि विश्वास संपादन करून एका सराफ व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३१ लाख ६५ हजार ४५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मंगळवार पेठ येथील बेलबाग परिसरात राहणारे सराफ व्यावसायिक हर्षद रमणलाल परमार (वय ३७) यांचे बाबुजमाल दर्गा समोर ‘महालक्ष्मी आभूषण’ नावाचे दुकान आहे. फिर्यादी परमार यांचे नातेवाईक असलेले आरोपी किरण तेजराज जैन उर्फ राठोड (वय ५१, रा. बंधन सेरेनिटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याने त्यांच्याशी असलेल्या नात्याचा गैरफायदा घेतला.
दिनांक २३ जानेवारी २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत आरोपीने वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवून देण्याची ऑर्डर घेत फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण ३ किलो १५६ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोने घेतले. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत १ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. मात्र, हे सोने किंवा त्याचे दागिने परत न करता आरोपीने परस्पर त्याची विल्हेवाट लावून फिर्यादीचा विश्वासघात केला.
यासोबतच, आरोपीने २०१८ ते २०२३ या कालावधीत फिर्यादीकडून वेळोवेळी खरेदी केलेल्या सोन्याच्या व्यवहारातील येणेबाकी असलेले ४१ लाख ६५ हजार ४५६ रुपयेही परत केले नाहीत. अशा प्रकारे सोन्याचे दागिने आणि जुनी थकबाकी मिळून आरोपीने फिर्यादीची एकूण २ कोटी ३१ लाख ६५ हजार ४५६ रुपयांची फसवणूक केली आहे.
या फसवणुकीप्रकरणी हर्षद परमार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८:३६ वाजता आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६ आणि ४०९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्री ११:४३ वाजता आरोपी किरण जैन उर्फ राठोड याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत.







