
कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) | शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल २ लाख रुपये किमतीच्या ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शाहूपुरी पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. जयकुमार राजेंद्र पाटील (वय ३१, रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी विठ्ठल शिवाजी सुतार (वय ४३, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (MH 09 ET 3970) ही दुचाकी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान आदित्य कॉर्नरच्या पुढे वुडलँड हॉटेलच्या बाजूला असलेल्या रोडवरून चोरीला गेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराजवळ येणार आहे. पोलिसांनी तात्काळ या परिसरात सापळा रचून संशयिताला दुचाकीसह ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने महिनाभरापूर्वी वुडलँड हॉटेलजवळून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीकडून इतर तीन गुन्ह्यांतील दुचाकीही जप्त करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येकी ५० हजार रुपये किमतीच्या ४ हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकींचा (MH 09 ET 3970, MH 09 DC 7597, MH 09 EF 8953 आणि MH 04 BE 4634) समावेश असून, जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत २ लाख रुपये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार आणि पोलीस अंमलदार सुशिलकुमार गायकवाड, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे, प्रशांत आवळे व गणेश पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करत आहेत.







