दोंडाईचासह धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने
दोंडाईचा (संतोष कोळी) – आज कोरोनामुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन झाला होता, राज्यात ही संपूर्ण लॉकडाऊन झाले
होते मात्र आता सर्व अनलॉक होत आहेत, मदीरा म्हणजेच दारुची दुकाने, मॉल, सुरू झाले असतांना देवांची मंदीरे का बंद आहेत असा सवाल भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा दोंडाईचा कुषी उत्पन बाजार समिती चे चेअरमन नारायण पाटील यांनी केला आहे.
‘दार उघड उध्दवा, दार उघड’ अशी हाक देत भाजपाकडुन संपूर्ण राज्यभरात मंदीर, मस्जिद,चर्च अशी देवांची प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी आंदोलन होत असून धुळे जिल्ह्यातही भाजपाकडुन आंदोलन करण्यात आले.
भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी दोंडाईचा येथील राम मंदीर येथे घंटानाद करून आंदोलन केले यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे, नगरसेवक नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, राकेश अग्रवाल, ह भ प नामदेव शास्त्री, संजय अग्रवाल आदी उपस्थित होते. तर भाजपाचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा. आर जी खैरनार यांच्या नेतृत्वाखाली वायपुर येथील दत्त मंदीरात घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. यावेळी जि प सदस्य पंकज कदम, मंदीराचे पुजारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नारायण पाटील म्हणाले की, हे महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचे संकटकाळ हाताळण्यात अत्यंत अपयशी ठरले असून एका खात्याचा मंत्री दुसऱ्या खात्याचा निर्णय घेण्याचे काम इथे होत आहे, राज्यात दारुची दुकाने, हॉटेल, मॉल सुरु झालीत मात्र मंदीरे सुरू झाली नाहीत, आता पर्यंत अनेक मागण्यांसाठी आंदोलने झाली मात्र देवाच्या मंदीरासाठी आंदोलन करण्याची मजबुरी झाली आहे. मंदीरामुळे कोरोना होण्याची भीती सरकारला आहे मात्र दारुची दुकाने, मॉल यातून कोरोना होणार नाही का.? शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो,परंतु त्याच देवांचे शिवसेनेला का वैर झाले आहे.? हेच समजत नाहीये का कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावात उध्दव ठाकरे सरकार काम करीत आहेत हेच समजत नाहीये.? शिवसेना हिंदुत्व विसरत आहेत. प्रार्थनास्थळे ही आपली मागणी पूर्ण करण्याचे एक ठिकाण आहे, आजच्या संकटकाळात जनतेला काही नियम घालून आपले श्रद्धास्थानाजवळ प्रार्थना करण्यासाठी जावु द्यावे अशी मागणीही यावेळी नारायण पाटील यांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा मंडळात १७ ठिकाणी, शिरपुर मंडळात १५ ठिकाणी, साक्री मंडळात १३ ठिकाणी घंटानाद आंदोलने करण्यात आली.




