नवी मुंबई (प्रतिनिधी) – ‘दार उघड उध्दवा दार’ या अभियानांतर्गत भाजप प्रभाग ९६ व ९७च्या वतीने नेरूळ सेक्टर १८
ए मधील शिवमंदिरात नेरूळ मंडळ अध्यक्ष राजू तिकोणे व जनसेवक गणेश भगत यांच्या नेतृत्वाखाली ‘घंटा नाद’ आंदोलन करण्यात आले.
टाळ वाजवून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा देत मंदिरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. चालू करा, चालू करा, मंदिरे चालू करा या घोषणांमध्ये स्थानिक रहीवाशीही सूर मिळविताना पहावयास मिळाले. संसार उध्दवस्त करणारी दारूची दुकाने महसूलासाठी सुरू करता आणि आध्यात्मिक ताकद देणारी, संस्काराचा वारसा जोपासणारी मंदिरे मात्र आजही कोरोनाच्या नावाखाली सरकार बंद ठेवत असल्याचा संताप यावेळी जनसेवक गणेश भगत यांनी घंटानाद आंदोलनाच्या वेळी व्यक्त केला. कोरोना महामारीचे गांभीर्य पाहता या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या आंदोलनात वॉर्ड अध्यक्ष रमेश नरवडे, समाजसेवक अशोक गांडाळ, सागर मोहिते,आसाराम शिंदे, अक्षय शिरगावकर, सुजित भोर, विशाल कंधारे, विजय पोटे, राजेद्र येवलकर, प्रवीण नागरे, गणेश खिरड, शशिकांत मोरे, रवींद्र भगत सहभागी झाले होते.







