मोबाईल हिसकावताना प्रतिकार केला म्हणून ड्रायव्हरची हत्‍या

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – रोकड व मोबाईल हिसकावताना प्रतिकार केला म्हणून, धारधार हत्याराने दोघांनी एका ड्रायव्हरवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.03) रात्री सव्वा अकरा ते पावने बाराच्या सुमारास स्वारगेट परिसरातील कोथरुडकडे जाणाऱ्या बस डेपो जवळील रस्त्यावर घडली. नागेश दगडू गुंड (वय.37,रा. केरुळ, ता. तुळजापूर, जिल्हा. उस्मानाबाद) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी, कमलाकर शरनू घोडके (वय.29, रा.दौंड फाटा कोथरुड, मुळ- उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघा अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध जबरी चोरीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत नागेश याच्या जवळील मोबाईल व रोकड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागेशने त्यांना प्रतिकार केला असता, चोरट्यांनी धारधार हत्याराने मांडीवर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नागेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत नागेश हा व्यावसायाने चालक आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याने त्याचा संपुर्ण परिवार मुळ गावी सोडला होता. मात्र खासगी गाड्या चालू झाल्यानंतर तो कामासाठी पुण्यात आला होता. गावाकडून निघताना नागेशने कमलाकरला कामासाठी पुण्यात येत असल्याची माहिती दिली होती. गुरूवारी रात्री पावने अकराच्या सुमारास तो हडपसरपर्यंत आला असून, स्वारगेटला येण्यासाठी बस मिळत नाही. खासगी वाहनाने तो स्वारगेटला येवून कोथरुड बस थांब्याजवळ थांबत असल्याचे सांगितले. त्यानुसार नागेश स्वारगेट बस स्थानकाजवळ येवून थांबला होता.
कमलाकर हे नागेशला घेण्यासाठी गेले असता, त्यांना बस थांब्याच्या खुर्चीवर नागेशची पिशवी दिसली, मात्र तो दिसला नाही. त्यामुळे त्यांनी फोन लावला. फोन लागल्यानंतर लगेच कट झाला. त्यामुळे कमलाकर यांनी आवाजाच्या दिशेने जावून पाहिले तेव्हा नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. कमलाकरने नागेशला याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने त्याच्यासोबत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर कमलाकरने स्वारगेट पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, रुग्णवाहिकेतून नागेशला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here