पुणे (अजय पवार) – पुण्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी त्यांनी कोरोनाच्या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन नक्की कुठे आणि काय चुकते आहे ? काय करण्याची आवश्यकता आहे? याबाबत अधिकार्यांची शाळा घेतली.आज, शनिवारी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह चार वेगवेगळ्या बैठकाही पवार यांनी बोलविल्या आहेत.
शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यासह ही संख्या तब्बल पावणेदोन लाखांच्या पुढे आहे. त्यातच रुग्णांना उपचारासाठी बेड्स, आयसीयू, व्हेंटीलेटर मिळत नाहीत. राज्य शासनाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या.
या बैठकीत त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून कोरोनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्यात प्रामुख्याने बिघडलेल्या परिस्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत? प्रशासन कुठे चुकते आहे का, ‘आयसीएमआर’च्या नियमांचे उल्लंघन होत नाही ना? यासंदर्भात विचारणा केली. तसेच, जम्बो रुग्णालयात एवढ्या तक्रारी का आहेत? त्यासाठी प्रशासन काय करत आहे? अशी विचारणा केली.
त्यावर राव यांनी, पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. तसेच, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात असल्याचे सांगितले. तसेच, रुग्णांच्या उपचारासाठी उभारलेल्या जम्बो रुग्णालयातील त्रुटी दूर करून, ते आता पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत असल्याचे राव यांनी सांगितले.
पवार यांनी आज (शनिवारी) कोरोनासंदर्भात चार वेगवेगळ्या बैठका बोलविल्या आहेत. त्यात लोकप्रतिनिधींच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्यासह महापौर, आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, संपादक यांचीही बैठक बोलाविली आहे.







