कोल्हापूर (नियाज जमादार) – महात्मा फुले जनआरोग्य येाजनेसारख्या अन्य शासकीय योजनांमधून खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहे. अशा शासकीय योजनेतून खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या कोरोनाबाधितांना जिल्हा परिषदेने रेमडीसीवीर इंजेक्शन मोफत द्यावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोनावर प्रभावी असणारे रेमडीसीवीर इंजेक्शन मोफत देण्यात येत होते. परंतु, वाढता खर्च लक्षात घेऊन हे वाटप जिल्हा परिषदेने थांबविले होते. यावर जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे गोरगरीब लोकांनी जगायचे की नाही, असा सवाल काही सदस्यांनी उपस्थित केला. तर खासगी रुग्णालयातून मागणी वाढल्यामुळे मोफत वितरण बंद केले असेल तर ते योग्य नाही. खासगी रुग्णालयात शासनाच्या आरोग्याच्या विविध योजनांमधून सामान्य लोकांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे अशा लोकांना तरी रेमडीसीवीर इंजेक्शन मोफत द्यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यानुसार हा ठराव करण्यात आला. यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
पंधराव्या वित्त आयोग्याबाबत राहुल आवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर पंधराव्या वित्त आयोगातील निधीचे वाटप जिल्हा परिषद अध्यक्षांनी यापूर्वीच केले असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले. राजवर्धन निंबाळकर यांनी न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत निधी वाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेऊ नये, असे मत मांडले.
टाकळेवाडी (ता.शिरोळ) येथील गावठाण विस्तारीकरणामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत शुक्रवारच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या बैठकीला उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, स्वाती सासने, डॉ. पद्माराणी पाटील आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी राहुल आवाडेंच्या उपस्थिती विषयी आक्षेप घेतला. त्या म्हणाले, आपण कोरोनाबाधित असतानाही बैठकीस कशाला उपस्थित राहिला. व्हीसीद्वारे आपण आपले मुद्दे मांडले असते तर चालले असते. यावर आवाडे यांनी आपण बरे होऊन आलो असल्याचे सांगितले.







