जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र राज्यात चित्रपट व टी.व्ही. सिरीयलच्या शुटींग करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी दिलीप दळवी यांनी एका पत्रकाद्वारे मानले आहे.
या पत्रकात आभार मानतांनाच कलावंत व तंत्रज्ञांची एक महत्त्वाची अडचण देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. शुटिंग सुरु झाले आहे मात्र शुटिंगस्थळी पोहचण्यासाठी कलावंत व तंत्रज्ञ यांना प्रचंड त्रास व यातना सहन कराव्या लागत आहेत. तसेच अंतर जास्त असल्याने ही बाब खर्चिकदेखील झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले कलावंत व तंत्रज्ञ अधिक आर्थिक विवंचनेत सापडत आहे. त्यामुळे या कलावंत व तंत्रज्ञांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या पत्रकातून केली आहे.








