नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुल्हेर गावात नातेवाईकाच्या लग्नात बोलवून सुद्धा आला नाही तसेच जुना घरगुती वाद काढत पडाळकर व पवार कुटुंबात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये चाकूचा वार पोटात वर्मी बसल्याने केदारनाथ भिका पवार (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जबर जखमी झाला. शुक्रवार (दि.४) घटनेमुळे मुल्हेरसह परिसरात खळबळ उडाली.
मुल्हेर येथील पडाळकर व पवार या जवळचे नातेसंबंध आहेत. परिवारात झालेल्या लग्नात का आला नाही अशा कारणावरून शुक्रवारी (दि.४) सायंकाळी वादावादी झाली. यातच पडाळकर कुटुंबाने जोरण (ता.बागलाण) येथील आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. यामुळे किरकोळ वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. पडाळकर कुटुंबीयांकडून झालेल्या चाकू हल्ल्यात केदारनाथ भिका पवार यांच्या पोटात वर्मी घाव बसल्याने रक्तबंबाळ झाले. वडिल गोविंद पवार यांच्यावर होणारा वार वाचविताना दिनेश गोविंद पवार (२३) यांच्या मांडीच्या मागील भागास चाकूचा वार बसून जबर जखमी झाला. केदारनाथ पवार यांना रुग्णालयात हलविण्यात आले त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असून त्यापैकी ४जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आदी साहित्य हस्तगत केले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.







