मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दूरचित्रवाणीच्या जगातील लोकप्रिय मालिका रामायणमध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं आहे. अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. ज्याला लोकांनी चांगलीच पसंती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद त्रिवेदी यांच्यावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही केली आहे.
कौस्तुभ त्रिवेदी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी आहेत. गेल्या ३ वर्षांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. या काळात त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मात्र मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.






