ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण शीळ रोडवर पोलीस व्हॅनला भीषण आग लागली आहे. ही व्हॅन मुंबई रेल्वे पोलिसांची असल्याची माहिती समोर येत आहे. कटई नाक्याजवळ या पोलीस व्हॅनने पेट घेतला असून आगीत गाडी जळून खाक झाली असून यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कटाई नाका जवळ, कल्याण येथे कल्याण-शीळ रोडवरती MH 05 C 118 या रेल्वे पोलीस व्हॅनला आग लागली. वाहतुक पोलीस कर्मचारी व कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदरची आग सात वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविली आहे. पोलीस व्हॅनने आचानक भर रस्त्यात पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली.
काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीमुळे जणू फटाके फुटल्याचे आवाज येत होते. त्यामुळे या गाडीत फटाके होते का ? जर असतील तर हे फटाके का आणले होते ?,कुठे नेले जात होते ? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत संबंधित यंत्रणानी मात्र काही बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत व्हॅनचे मात्र नुकसान झाले. या दरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.






