सातारा जिल्हय़ाला कोविडसाठी 92 कोटीचा निधी द्या – पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

  • जिल्हय़ात बुधवारी 817 बाधित
  • 738 जणांना डिस्चार्ज, 21 मृत्यू
  • कराडमध्ये ऑक्सिजन चळवळीस जोर

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्हय़ात कोरोनाचा उद्रेक झाला असून बुधवारी रात्री आलेल्या अहवालात एकुण 817 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात 738 जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात कोरोनाचे संकट वाढत असताना व गावे स्वयंस्फूर्तीने बंद पाळत असताना नागरिक बेफिकीरीने वागत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मास्क न वापरणाऱया तसेच सोशल डिस्टन्स न पाळणाऱया लोकांवर कारवाई वाढवली आहे. दरम्यान, जिह्यातील कोविड 19 रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी 91 कोटी 84 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सहकारमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
जंबो हॉस्पिटलसह अन्य सुविधांसाठी निधीची मागणी
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत असलेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पत्र दिले आहे. सातारा जिह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथे जंबो हॉस्पिटलला मान्यता प्राप्त झालेली आहे. येथे 250 खाटांचे ऑक्सिजन बेड्स हॉस्पिटल, अनुषंगिक साधनसामुग्री, मनुष्यबळ यासाठी रुपये 36 कोटी 55 लाख 32 हजार रूपयांचा निधी उपलब्ध करावा. काशिळ (ता. सातारा) येथे ट्रामा सेंटरचे 50 आयसीयु बेड्सचे नवीन हॉस्पिटल उभारणे व साहित्य खरेदीसाठी 4 कोटी 84 लाख 93 हजार इतका निधी मिळावा. तसेच बाधित व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, वैद्यकीय देखभाल, दुरुस्ती, प्रयोगशाळा चाचणी, व्हेंटिलेटर हवा शुद्धीकरण यंत्र इतर प्रशासकीय स्तरावरील अनुषंगिक साधनसामग्री खर्चासाठी 50 कोटी 43 लाख 90 लक्ष रुपये इतका निधी असा एकुण 91 कोटी 84 लाख 15 हजार रूपयांचा निधी तातडीने जिल्हय़ाला द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये फिजिशियन हे पद चार वर्षे रिक्त आहे. हे पद व अन्य रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
738 नागरिकांना दिला डिस्चार्ज
बाधितांचा आकडा वाढल्याने डिस्चार्जही वाढला आहे. बुधवारी जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 738 नागरिकांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
21 बाधितांचा मृत्यू
पन्नास वर्षांवरील रूग्णांत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी 21 जणांचा मृत्यू झाला. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे गडकर आळी येथील 52 वर्षीय महिला, ग्रीन विंग अपार्टपमेंट सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, लिंब फाटा येथील 64 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 84 वर्षीय पुरुष, भवानी पेठ सातारा येथील 58 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, ओंड कराड येथील 65 वर्षीय महिला. तसेच जिल्याग्तील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सातारारोड येथील 72 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 50 वर्षीय महिला, बावधन वाई येथील 65 वर्षीय पुरुष, धर्मपुरी वाई येथील 75 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, येणके कराड येथील 65 वर्षीय महिला, मुजावर कॉलनी कराड येथील 78 वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील 77 वर्षीय पुरुष, गोटे कराड येथील 93 वर्षीय महिला, चोरे कराड येथील 70 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर कराड येथील 85 वर्षीय पुरुष, पुसेसावळी खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, टेंभू कराड येथील 65 वर्षीय पुरुष असे एकूण 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
960 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25, उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 77, कोरेगाव 52, वाई 106, खंडाळा 102, रायगांव 107, पानमळेवाडी 159, मायणी 61, महाबळेश्वर 42, दहिवडी 40 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 168 असे एकुण 960 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. मंगळवारी रात्रीच्या अहवालात 921 इतक्या उच्चांकी रूग्णसंख्येची नोंद झाली होती.
ऑक्सिजन चळवळीस वेग; रयत संघटनेने दिले 20 पोर्टेबल ऑक्सिजन
माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱया रयत संघटनेतील सहकारी संस्थांच्या वतीने कराड येथील सह्याद्री हॉस्पिटला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. रयत संघटनेचे युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांच्या पुढाकारातून कोयना बँक, बाजार समिती व स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्था उंडाळे या संस्थेच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला 20 पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या. त्याचे लोकार्पण प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरादीप वाकडे, ऍड. उदयसिंह पाटील, सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण, रयत संघटनेचे कार्यवाह धनाजी काटकर यांचे प्रमुख उपस्थिती झाले. कराडमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी विविध संस्था, नागरिकांनी सुमारे 80 पोर्टेबल मशिन रूग्णांसाठी उपलब्ध केली आहेत. रयत संघटनेने 20 मशिन दिल्याने आता मशिनचा आकडा 100 झाला आहे.
बुधवारी जिल्हय़ात एकुण बाधित 817, एकुण मुक्त 738, एकुण बळी 21
बुधवारपर्यंत जिल्हय़ात घेतलेले एकूण नमुने — 52671, एकूण बाधित — 21347, घरी सोडण्यात आलेले –12189, मृत्यू — 557, उपचारार्थ रुग्ण –8601

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here