कोरोनातलाही वेगळा “पॉझिटिव्ह” नेस!!

“त्या” अनुभवातून निगेटिव्ह न होता इतरांच्या मदत आणि
आधारासाठी उभारली “कोविड उपचार यंत्रणा”

सिधुदुर्ग (विशेष प्रतिनिधी) – काही दिवसांपूर्वीच आलेल्या बातमीने खरे तर मालवण हादरले होते. एका प्रथितयश व रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टर्ससह कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची ती बातमी होती. सर्वांनाच हा धक्का होता. लोकांनाच नव्हे, तर हॉस्पिटलच्या डॉक्टर्ससह त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना देखील! पण… सारेच एका धैर्याने या परिस्थितीला सामोरे गेले. त्यातून यथावकाश बाहेरही पडले..
आपल्या वैद्यकीय अभ्यासप्रबंधांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी लाभलेल्या डॉक्टर विवेक रेडकर आणि मालवणमधील त्यांच्या डॉक्टर रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या पुढील वाटचालीचीच ही गोष्ट आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णाला कशाची नेमकी गरज अधिक असते, हे या सगळ्या टीमने अनुभवातून जाणून घेतले होते. सगळ्या नियम आणि निकषाच्या कसोट्या पाळत यातून बरे होण्याची पहिली कामगिरी पार पाडली. आणि यानंतर मात्र, कोरोनावर चांगली ट्रीटमेंट आपणच देऊ, असा विचार करून त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. निसर्गरम्य कांदळगाव परिसरात निलक्रांती मल्टीपर्पझ सेंटरमधील शानदार रिसॉर्टचे तेवढ्याच सुविधादायी हॉस्पिटलमध्ये रूपांतरण केलं. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही आरामदायी आणि तेवढीच सुरक्षित उपचारसेवा मिळेल हे पाहिलं गेलं. डॉ. विवेक रेडकर यांच्या रेडकर हॉस्पिटल व मार्गदर्शनाखाली डॉक्टर रेडकर रिसर्च सेंटरच्या विश्वस्त टीमचा भाग असलेले डॉ.दर्शन खानोलकर, डॉ.रामचंद्र चव्हाण, डॉ. क्षीरसागर, निलक्रांतीचे संस्थापक श्री रविकिरण उर्फ विकी तोरसकर अशा सर्वांनी ही जबाबदारी अतिशय मेहनत आणि तळमळीने पार पाडली. आपल्या परिवारासोबतच, डॉ.दर्शन खानोलकर, डॉ.क्षीरसागर, डॉ.रामचंद्र चव्हाण, डॉ.अनिरुद्ध मेहेंदळे, डॉ.बालाजी पाटील आणि डॉ.दिघे अशा सर्वांचे या संकल्पनेला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यातूनच हा प्रकल्प साकार होत असल्याचे डॉ.विवेक रेडकर यांनी आवर्जून नमूद केले. रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि नीलक्रांती या संस्थेने जिल्हा प्रशासनाकडे या कांदळगाव येथील नीलक्रांती संस्थेच्या मल्टिपर्पज सेंटर मध्ये समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र (Dedicated Covid Health Centre-DCHC)” सुरु करण्याची परवानगी अधिकृतपणे मागितली, आणि सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घेत या केंद्रास मान्यतादेखील दिली. कोरोनातलाही एक प्रचंड “पॉझिटिव्ह”नेस अशा पद्धतीने दाखवून देण्याचा या सगळ्या टीमचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
आज कोविडची परिस्थिती जिल्ह्यात फारच गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातला एकही रुग्ण दगावू नये हा संकल्प घेऊन ही टीम काम करते आहे. येणाऱ्या काळात अकलूज येथील प्रसिध्द डॉक्टर एम.के. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटलद्वारे टेलीमेडिसिनची व्यवस्था या उपचार केंद्रात उपलब्ध करून दिली जाईल. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी दोन वर्षांपूर्वीच त्यांना अमेरिकेतील कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी सोसायटीची वैद्यकीय क्षेत्रातील जगात अत्यंत मानाची समजली जाणारी फेलोशीप देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदाही यानिमित्ताने सिंधुदुर्गातील रुग्णांनाही मिळेल.
येत्या सोमवारी १४ सप्टेंबरला या कोव्हीड आरोग्य केंद्राचे “लोकार्पण” जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या टीमचे कौतुक करतानाच विशेष अभिनंदन करावेसे वाटते ते सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी सौ. के.मंजुलक्ष्मी यांचे! शासकीय यंत्रणा ही लालफितीत स्वतःला गुंडाळून घेत वावरत असते असा सार्वसामान्यत: अनुभव येत असतो. पण या महिला जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यात ज्या संयमाने आणि कौशल्याने कोविडची गंभीर परिस्थिती हाताळली, राजकीय वादविवादाचे सावट स्वतःवर पडू न देता निर्णयक्षमता दाखवली त्याला तोड नाही. खऱ्या अर्थाने त्या कोविड-महायोध्या आहेत असे म्हंटले तरी याबाबतीत कोणाचीही दुमत असणार नाही. रेडकर हॉस्पिटलच्या या संकल्पनेला मान्यता देत त्यांनी पुन्हा एकदा आपली निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. संकटाच्या पार्श्वभूमीवरही सकारात्मक दृष्टिकोन बाळगत जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या सगळ्याच टीमचे पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छादेखील!!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here