म्हसावद रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था.. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था…

शहादा (विजय निकम) – शहादा तालुक्यातील खेतिया फाटा ते म्हसावद गावापर्यंत रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती चाळण होवून वाट लागली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त होवून मस्त झाला आहे.रस्त्याची दुरूस्ती केव्हा होईल? झाडाझुडूपांमुळे रस्ता अरूंद होवून साईडपट्ट्या गायब झाल्या तरी संबंधीत विभाग सुस्त…? असा संतप्त सवाल परिसरातील जनतेने केला आहे.

याबाबत वृत्त असे की,खेतिया फाटा ते म्हसावद गावापर्यंत रस्त्याची अक्षरशः मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.दुचाकी नागमोडी वळणे घेवून चालवावी लागते तर चारचाकी वाहन कीतीही खड्डे टाळले तरी खड्ड्यात वाहन पडते.वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असली तरी पाठीचे,मणक्याचे,मानेचे आजार होवून दुखणे वाढलेय.तर वहानांचे नादुरूस्त होणे सुरूच आहे.पाऊस आला की डबक्यांमुळे खड्डे दिसतात.पाऊस गेला की खड्डे दिसतच नाही.रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी दुर्दशा रस्त्याची झाली आहे.रस्त्याला लागून झाडे,झाडाच्या फांद्या वाढून रस्त्यावर येत आहेत.परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्या गायब झाल्या आहेत.पाच मीटरचा रस्ता साडे तीन मीटरचा झालाय तरी संबंधीत विभागाला काहीच सोयर सुतक नाही.
नवलपुर,पिंपरीच्यापुढे,अशोका पेट्रोलियमजवळ तर वाहने टाळणे साठी रस्ता शोधावा लागतो.साईड पटट्याच नाहीत. जुनवणे व नवलपुर फाट्यावरील गतीरोधक “असून अडथळा नसून खोळंबा” असे ठरत आहेत.दोन महिन्यात खड्डे दुरूस्ती तर सोडाच संबंधीत विभागाने ढुंकुनही पाहीले नाही.धडगाव,तोरणमाळ सारख्या अतिदुर्गम भागाकडे जाणारा एकमेव मुख्य रस्ता असूनही दुर्लक्ष केले जात आहे.नवलपुर फाट्यावरील बाभळीचे झाड वाकून रस्त्यावर आले आहे.दुचाकीस्वाराला फांद्यांचा फटका हमखास बसतो.
संबंधीत रस्त्याची दुरूस्ती करून जनतेला दिलासा द्यावा . या रस्त्यात प्रचंड प्रमाणात खड्डे असल्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात परंतु एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे की काय ? एखाद्याचा जीव गेल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी या रस्त्याच्या दुरुस्ती कडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here